अकोला: भारतीय ज्ञान व संस्कृतीच्या दानातून विश्वाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य केवळ भारताकडे आहे. त्याचबरोबर सशक्त भारताच्या निर्मितीसाठी शक्तिपूजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन विज्ञान भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव व अकोला शहर विजयादशमी उत्सवाचे प्रमुख वक्ते जयंत सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, १३ रोजी झालेल्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते उद्बोधन करीत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व येथील नेत्र शल्य चिकित्सक डॉ. शिरीष थोरात, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे व महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांची उपस्थिती होती.जयंत सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की, विजयादशमीच्या दिवशी आम्ही शस्त्राचे पूजन करीत त्यासोबत एकरूप होतो. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शक्तीचे जागरण करीत आहे. आम्ही सगळे एक आहोत, आमची संस्कृती एक आहे. विविधतेत आमची एकता आहे, याचे विस्मरण झाल्याने आमच्यावर परकियांची अनेक आक्रमणे झालीत. बलहीनता हे आमच्या राष्ट्राच्या आणि समाजाच्या अधोगतीचे कारण ठरले. त्यामुळे शेकडो वर्षे आमची गुलामगिरीत गेली. आत्मविश्वास जागृतीसाठी शक्तीची आराधना आवश्यक होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याच देशभक्तीच्या शक्तीचे जनजागरण जनमानसात केले. समाजात आत्मविश्वास निर्माण केला. ९४ वर्षांनंतर आता देशात परिवर्तन होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले.आम्ही सर्व एक आहोत, हे संघाने समाजाला शिकविले. समाजातील प्रत्येक व्यक्ती देशभक्ती प्रगट करू शकतो, याविषयी भावजागृतीचे कार्य संघाने केल्याचे असेही सहस्रबुद्धे म्हणाले. जगाला योग आणि आयुर्वेदाचे ज्ञान देत ते इतरांनी स्वीकारल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.विजयादशमी महोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजनाने झाली. त्यानंतर प्रात्यक्षिक, योग, घोषवादन, सांघिक गीत, सुभाषित सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिरीष थोरात यांनी जीवनात शस्त्र पूजनाचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांनी केले. त्यांनी अकोल्यातील संघ कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने संघप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.
विश्वाला प्रगतीकडे नेण्याचे सामर्थ्य केवळ भारताकडेच - जयंत सहस्रबुद्धे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:44 PM