अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिलेल्या इशाऱ्याची कर वसुली विभागाने किती गांभीर्याने दखल घेतली, याचे परिणाम समोर आले आहेत. ३१ मार्चपर्यंत अकोलेकरांकडे थकबाकी असलेल्या १०५ कोटींपैकी केवळ ४३ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. थकीत कर वसुलीची आकडेवारी पाहता शहरातील उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर व विधिज्ञांना अभय देण्यात आल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.गोरगरिबांच्या अतिक्रमणावर जेसीबी चालविण्याचे धाडस करणाºया महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराचा भरणा न करणाºया उच्चभ्रू नागरिक, व्यावसायिक, उद्योजक तसेच डॉक्टरांसमोर सपशेल शरणागती पत्करल्याचे दिसत आहे. मनपाच्या मिळमिळीत धोरणामुळेच संबंधित थकबाकीधारकांनी टॅक्स जमा करण्याकडे पाठ फिरविली आहे. कारवाईचे नियोजन केवळ कागदावर राहत असल्याने थकबाकीची रक्कम जमा करण्यात मालमत्ता कर वसुली विभाग सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. २०१६ पूर्वी मनपाच्या दप्तरी ७१ हजार मालमत्ता होत्या. मूल्यांकनानंतर त्यामध्ये वाढ होऊन १ लाख ४ हजार व हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात ५० हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. यापासून मनपाला दरवर्षी ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याचा दावा केला जात आहे. चालू व थकीत मालमत्ता कराच्या एकूण १०५ कोटींपैकी ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर वसुली विभागाने केवळ ४३ कोटींची वसुली केल्याचे समोर आले.आयुक्त साहेब आता पुढे काय?टॅक्स वसुली होत नसल्यामुळे सहायक कर अधीक्षकांसह २५ वसुली निरीक्षकांची वेतनवाढ रद्द करण्याचा आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला होता, तसेच ३१ मार्चपर्यंत जे कर्मचारी वसुलीचा आकडा ९० टक्के पार करतील, त्यांचे वेतन पूर्ववत करून वसुलीस असमर्थ ठरणाºया कर्मचाऱ्यांवर प्रस्तावित कारवाई कायम ठेवण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. गतवर्षीपेक्षा यंदा कमी वसुली झाल्याने आयुक्त पुढे काय करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.१०० जणांचे ‘लक्ष्य’ विरले हवेत!शहरातील डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यावसायिक, व्यापाºयांकडे टॅक्सची सर्वाधिक थकबाकी आहे. मनपाने प्रत्येक झोनमधील अशा १०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली होती. ही यादी हवेत विरल्याचे यानिमित्ताने समोर आले.
बड्या मालमत्ताधारकांना अभयथकबाकीदारांमध्ये सर्वाधिक भरणा प्रतिष्ठित व्यक्ती, राजकारणी, डॉक्टर, विधिज्ञ, व्यापाऱ्यांसह उद्योजकांचा आहे. प्रशासनाने अशा बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माशी कुठे शिंकली देव जाणे, ही नावे प्रसिद्ध झालीच नाहीत. मनपा आयुक्त संजय कापडणीस अशा बड्या मालमत्ताधारकांना अभय देणार की त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.