अकोला - राज्यात दोन वर्षांपासून गुटखा विक्रीवर बंदी लादण्यात आली असली तरी केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या प्रत्येक एक्स्प्रेस आणि लोकल रेल्वे गाड्यांमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. महिला व अल्पवयीन मुलेही गुटख्याची विक्री करीत असल्याचे यावेळी समोर आले असून, रेल्वेतील पोलिसांसमोरही गुटख्याची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. आरोग्यास हानीकारक असलेल्या गुटखा, सुगंधी सुपारी, मावा यासह अशा प्रकारच्या विविध गुटख्यांवर राज्य शासनाने नोव्हेंबर २0१३ मध्ये बंदी लादली होती. त्यानंतर राज्यात कुठेही गुटखा विक्री होत असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील कोणत्याही शहरात आणि गावात खुलेआम गुटखा विक्री करण्यात येत असल्याने दोन वर्षांंपूर्वी लागू करण्यात आलेली गुटखा बंदी सपशेल फोल ठरली असल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. रेल्वेमध्ये महिला आणि अल्पवयीन मुले सर्रास गुटखा विक्री करीत असून, त्यांच्याकडे रेल्वे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी दिसून आले. लोकमतच्या चमूने अकोला ते शेगाव आणि अकोला ते मूर्तिजापूर या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करून रेल्वेत खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे वास्तव समोर आणले आहे.
*चढय़ा दराने विक्री
रेल्वेमध्ये गुटख्याची चढय़ा दराने विक्री करण्यात येत असून, यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येते. अन्न व औषध प्रशासन जिल्हय़ातील गुटखा माफियांवर कारवाई करीत असली तरी रेल्वेतील गुटखा विक्रीवर निर्बंंध लावणे हे त्यांच्यासाठी अडचणीचे असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनानेच या गुटखा महिलांकडून गुटखा विक्रीविक्रीवर बंदी आणण्याची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पोलिसांनीही या गुटखा माफियांवर कारवाई करण्याची गरज आहे. आरपीएफ आणि अन्न सुरक्षा विभागाचा हवा वॉचरेल्वेच्या विविध गाड्यांमध्ये महिलांकडूनच गुटख्याची विक्री करीत असल्याचे अमरावती-भुसावळ पॅसेंजरमध्ये विक्री लोकमतने केलेल्या पाहणीत समोर आले. या महिलांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाही अडचणी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका ठिकाणी गुटख्यावर बंदी आहे तर राज्य ओलांडताच त्यावर कुठलेही निर्बंंध नाहीत. त्यामुळे रेल्वेसारख्या ठिकाणी गुटखा विक्रीवर निर्बंंध लावण्यात रेल्वे प्रशासनाचीही गरज असल्याची माहिती आहे.