शहरात एक जण काेराेना पाॅझिटिव्ह
अकाेला: मागील काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरल्याचे समाेर आले आहे. असे असले तरीही अद्याप काेराेनाचा संसर्ग कायम असल्याचे दिसत आहे. साेमवारी मनपाला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार दक्षिण झाेनमधील एका नागरिकाला काेराेनाची लागण झाली आहे. नागरिकांनी गाफील न राहता नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
शहरात ५५९ जणांनी दिले नमुने
अकाेला: जीवघेण्या काेराेना विषाणूने फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत हाहाकार घातला हाेता. ही लाट ओसरल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरीही काेराेनाची लक्षणे आढळून येत आहेत. साेमवारी अशी लक्षणे असलेल्या ५५९ जणांनी नाकातील स्त्रावाचे नमुने दिले आहेत. यामध्ये ४० जणांनी आरटीपीसीआर व ५१९ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली आहे.
अतिक्रमित इमारत धाराशायी
अकाेला: दक्षिण झोन अंतर्गत कौलखेड रोड वरील बळवंत कॉलनी येथील सुभाष इंगोले यांनी मनपाची पूर्व परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले होते. त्यांना बांधकाम मंजुरीचे कागदपत्रे सादर करण्यासाठी सूचना देण्यात आली होती. परंतु त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांच्या अनधिकृत बांधकामावर साेमवारी मनपा आयुक्त नीमा अरोरा यांच्या आदेशान्वये निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
अकाेटफैल चाैकात नाला तुंबला
अकाेला: मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्दळीच्या असलेल्या अकाेटफैल चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाई करण्याची गरज असून यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आराेग्य निरीक्षक सुस्तावले
अकाेला: शहराच्या कानाकाेपऱ्यात हाेणाऱ्या साफसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
पथदिवे सुरु करा!
अकाेला: प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून ही समस्या दूर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
सांडपाणी तुंबले; नागरिक त्रस्त
अकाेला: प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या गंगा नगर व कायनात परिसरात नाल्यांची साफसफाई हाेत नसल्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यांवर साचले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून प्रभागातील नगरसेवक फिरकूनही पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे.
अकाेलेकरांची नियमांकडे पाठ
अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ताे अद्यापही कायम आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असताना देखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. काेराेना रुग्णांची संख्या घसरल्यामुळे अकाेलेकर नियमांकडे कानाडाेळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला: वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी,खाेकला,अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.