अकाेला: काेराेना विषाणूच्या सबबीखाली महाविकास आघाडी सरकारने हिंदू धर्मियांच्या भावनांशी खेळ चालवल्याचा आराेप करीत राज्य शासनाने तातडीने मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी साेमवारी भारतीय जनता पार्टी, श्रीराम नवमी शाेभायात्रा समिती व भाजप अध्यात्मिक आघाडीच्यावतीने माेठ्या राम मंदिरासमाेर शंखनाद आंदाेलन करण्यात आले. यावेळी देशभरातील मंदिरे खुली असल्याचा दावा भाजपच्या लाेकप्रतिनीधी व पदाधिकाऱ्यांनी केला.
संपूर्ण देशातील मंदिरे खुली असताना महाराष्ट्रात केवळ महाविकास आघाडीच्या हुकूमशाही व एककल्ली कारभारामुळे धार्मिक स्थळे बंद असल्याचा आराेप भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी केला. राज्य सरकार हिंदू धर्मियांच्या सणांवर गदा आणत असल्याचीही टिका त्यांनी केली. राज्य शासनाने सणासुदीचे दिवस लक्षात घेता मंदिरे तातडीने खुली करावीत,अन्यथा तिव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिला. आंदोलनात माजी स्थायी समिती सभापती सतीश ढगे, विनोद मापारी, जयंत मसने, माधव मानकर, गिरीश जोशी, चंदा शर्मा, गितांजली शेगोकार, रंजना विंचनकर, साधना येवले, हेमंत शर्मा, दिलीप मिश्रा, राजू पेंढारी, निकिता देशमुख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवभक्तांवर पाेलिसांकडून अत्याचार
श्रावण महिन्यात श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करणाऱ्या कावडधारी शिवभक्तांवर पाेलिसांकडून अत्याचार केला जात असल्याची टिका यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली. शिवभक्तांचे साहित्य जप्त करणे, त्यांना मारहाण करुन त्यांच्यावर खाेटे गुन्हे दाखल केले जात असून हा प्रकार पाेलिसांनी बंद न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा अग्रवाल यांनी दिला.