अकाेला: शहरात मुख्य बाजारपेठेला अतिक्रमणाचा विळखा घातलेल्या लघु व्यावसायिक,फेरीवाल्यांना व्यवसायासाठी खुले नाट्यगृहामागील व भाटे क्लबच्या मागील पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही व्यावसायिकांनी याकडे पाठ फिरविल्याचे मंगळवारी दिसून आले. ही बाब लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता गांधी चाैकात थाटलेले अतिक्रमण हटविले. यावेळी चाैपाटीवरील अनेक व्यावसायिकांच्या गाड्या व साहित्य जप्त करण्याची कारवाइ केली. मनपाच्या आवारभिंतीलगत तसेच गांधी राेडवरील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमकांनी हातगाडीवर दुकाने थाटली आहेत. यामध्ये रेडीमेड कापड विक्रेता, फळ विक्रेता यांसह किरकाेळ व्यावसायिकांचा समावेश आहे. मनपात आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारताच निमा अराेरा यांनी प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेत साेमवारी धडक कारवाइला प्रारंभ केला. त्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी खुले नाट्यगृहामागील व भाटे क्लबच्या मागील पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. याठिकाणी रस्त्याची आखणी करण्यासह व्यावसायिकांच्या जागेची आखणी करून देण्यात आली. साेमवारी कारवाइसाठी आयुक्त निमा अराेरा स्वत: रस्त्यावर उतरल्या. शहराच्या मध्यवर्ती भागातील अतिक्रमण हटविण्याची कारवाइ केल्यानंतरही लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी पर्यायी जागेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
सायंकाळी पुन्हा कारवाइ
मंगळवारी सायंकाळी गांधी चाैक, चाैपाटी व खुले नाट्यगृह आदी परिसरात लघु व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याचे समजताच मनपा आयुक्त निमा अराेरा पुन्हा कारवाइसाठी समाेर आल्या. यावेळी गांधी चाैकातील अतिक्रमण दुर करून चाैपाटीवरील व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाइ केली. ही कारवाइ दरराेज सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.