अकोला, दि. ६- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार २५ टक्के प्रवेश ऑनलाइन पद्धतीने देण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली. रविवारपासून ऑनलाइनवर प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे; परंतु ऑनलाइन प्रवेशाची माहिती भरण्यासाठी शिक्षण विभागाने दिलेली लिंकच उघडत नसल्यामुळे पालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. लिंक उघडत नसल्याने पालक त्रस्त झाले आहेत. शिक्षण विभागाने पालकांच्या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, दिव्यांग या वर्गवारीनुसार चालू वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंंंत प्रवेश दिले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना २५ टक्के प्रवेशासाठी शाळांची नोंदणी करण्याचे बजावण्यात आले. त्यासाठी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील १९३ पात्र शाळांपैकी १३७ शाळांची नोंदणी झाली. उर्वरित ५६ शाळांनीसुद्धा रविवारी नोंदणी केली आणि ५ फेब्रुवारीपासून ते २१ फेब्रुवारीपर्यंंंत पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाइन माहिती भरण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आपल्या पाल्याला नामांकित आणि दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी पालक धडपड करीत आहेत. ५ फेब्रुवारीपासूनच पालकांनी शिक्षण विभागाने दिलेली एज्युकेशन.महाराष्ट्र.जीओव्ही.इन या वेबसाइटवर जाऊन पाल्यांची प्रवेशासंबंधीची माहिती भरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत; परंतु लिंकच उघडत नसल्यामुळे पालकांची पंचाईत झाली आहे. त्रस्त झालेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडे ही लिंक सुरू करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी) सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे लिंक उघडत नाही. राज्यात इतर ठिकाणीसुद्धा ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु पालकांनी घाबरून जावु नये. ऑनलाइन प्रवेशासाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढविली जाईल, त्यामुळे पालकांना पाल्यांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करता येईल. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक.
ऑनलाइन प्रवेशासाठी संकेतस्थळाची लिंकच उघडेना!
By admin | Published: February 07, 2017 3:27 AM