विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमार्फत विविध लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांच्या नावांचा गैरवापर करीत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या बनावट योजनेच्या नावावर अकोट शहरात लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. दररोज तहसील परिसरातील व इतर दुकानांमध्ये या योजनेच्या अर्जांची मोठय़ा प्रमाणात विक्री सुरू आहे. या गैरप्रकारातून मुलींच्या पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेच्या बनावट अर्जांची विक्री शहरातील काही दुकानांवर २0 ते २५ रुपयांत केली जात आहे. या अर्जांवर संपूर्ण माहिती भरावयाची असून, हा अर्ज भरणार्या सर्व मुलींना दोन लाख रुपये मिळणार असल्याचे अर्जावर नमूद केले आहे. अर्जासोबत आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, बोनाफाईड, नगरसेवक किंवा सरपंचाचे ओळखपत्र आदी कागदपत्रं जोडून, हा अर्ज नवी दिल्ली येथील भारत सरकार महिला एव् बाल विकास मंत्रालयात पाठविण्याचा पत्ता देण्यात आला आहे. मुलगी असल्याने दोन लाख मिळणार, या अफवांना नागरिक मोठय़ा प्रमाणात अकोट परिसरात बळी पडत आहेत. फॉर्म विक्री करणार्यांनी सुद्धा या अफवांचा फायदा घेत प्रत्येक अर्ज २0 ते २५ रुपये, भरून देणे व पोस्ट करण्यापर्यंत प्रत्येकाकडून १00 ते १५0 रुपये उकळत आहेत. आतापर्यंत अकोट तालुक्यात शेकडो अर्जांची विक्री झाली असून, ओळख पत्रांकरिता नागरिक नगरसेवक व सरपंचांच्या घरी गर्दी करीत आहेत. हे सर्व अर्ज पोस्टातून दिल्लीलासुद्धा पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र अशी कोण तीही योजना केंद्र शासनाने लागू केली नाही. शिवाय अशा योजनांचे अर्ज सुद्धा थेट पोस्टाद्वारे मागविले जात नाही, तर समाजकल्याण विभागामार्फत शासकीय कार्यालयामधून भरून घेतले जातात; परंतु शासकीय कार्यालयांमध्ये हा अर्ज मिळत नसून, खासगी दुकानांमधून हा अर्ज विक्री केले जात आहेत. याबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. त्यामुळे ही विक्री जोमाने वाढली असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून, जनतेची फसवणूक थांबविणे गरजेचे झाले आहे.
अर्जाची छपाई, विक्री करणार्यांची चौकशी ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या अर्जाची विक्री करणार्या दुकानदारांची व ते भरून देऊन जनतेची फसवणूक करणार्या टोळींची चौकशी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने केंद्र शासनाच्या अर्जाची छ पाई व विक्री करणार्यांचा शोध घेत कठोर कारवाई करून, या लुटीला आळा घालणे गरजेचे आहे.
अकोट तालुक्यात प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेंतर्गत दोन लाख प्रत्येक मुलीला मिळणार, अशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही. जनतेने अशा प्रकाराला बळी न पडता शासकीय कार्यालयांमध्ये पडताळणी करावी व ज्यांची अर्ज विकत घेऊन फसवणूक झाली असेल, त्यांनी थेट तक्रार करावी. - विश्वनाथ घुगे, तहसीलदार अकोट