बाळापूर मतदारसंघात पातूरसह अकाेला तालुक्यातील गावांचा समावेश हाेताे. जिल्ह्यात राज्य शासनाच्या वतीने तीन मतदारसंघांत उपविभागीय अधिकारी (कृषी) कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी थेट अकाेट येथे कृषी कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. पातूर तालुक्यात आदिवासी, बंजारा समाज दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्याला असून, याठिकाणच्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध याेजनांचा लाभ घेण्यासाठी अकाेट येथील कृषी कार्यालयात जाणे शक्यच हाेत नाही. पातूर, बाळापूर व अकाेटमधील अंतर लक्षात घेता शासनाच्या याेजनांपासून शेतकरी वंचित राहत असल्याचा मुद्दा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे उपस्थित केला. यावर ताेडगा म्हणून बाळापूर येथे स्वतंत्र कृषी कार्यालयाचे गठन करण्याची मागणी आमदार देशमुख यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे.
याेजनांपासून शेतकरी अनभिज्ञ
शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाकडून विविध याेजना अंमलात आणल्या जातात. कृषी कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात कुचराई केली जात असून, काही बाेटावर माेजता येणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ दिला जात असल्याचे समाेर आले आहे. प्रशासकीय यंत्रणेमुळे शेतकरी याेजनांपासून वंचित राहत असल्याचा मुद्दा आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्र्यांकडे उपस्थित केला.
प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
शासनाच्या विविध याेजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणेची गरज आहे. पातूर व बाळापूरमधील शेतकऱ्यांना अकाेट येथे जाणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन कृषिमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषी खात्याच्या सचिवांना दिले.