लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात विना परवाना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या आॅटो व स्कूल व्हॅनवर वाहतूक शाखेकडून सोमवारी पहाटेपासूनच कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला. यामध्ये ५२ आॅटो व ६ स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.शहरात सध्या आॅटोचालक आपला मनमानी कारभार करीत असून, या मुजोर आॅटोचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने कंबर कसली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी पथकासह अवैधरीत्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या आॅटोचालकांवर कारवाईचा सपाटा सुरू करीत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या आॅटो व स्कूल व्हॅनचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेने दंडात्मक कारवाई केली. एक आॅटोचालक तर चक्क २४ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वाहतूक करताना आढळून आला. काही स्कूल व्हॅनमध्ये विना परवाना ‘गॅस किट’ वाहतूक शाखेच्या तपासणीत आढळून आली. विना परवाना आणि विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या ५२ आॅटो व ६ स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्येक आॅटो व स्कूल व्हॅनला २000 रुपये दंड आकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी थोडं जागृत होऊन त्यांच्या मुलांना अशा प्रकारच्या विना परवाना आॅटोमधून शाळेत सोडू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी केले आहे.
वाहतूक शाखेकडून स्कूल व्हॅन आणि आॅटोवर कारवाई
By admin | Published: July 11, 2017 1:09 AM