अकोला : हरविलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ''ऑपरेशन मुस्कान २०२०'' ही मोहीम १ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग यांनी दिला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येणार असून, सदर बालके आई-वडिलांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.
हरविलेली अल्पवयीन मुले, भीक मागणारी, कचरा गोळा करणारी, मंदिर, रुग्णालय परिसरात आढळून येणारी अल्पवयीन मुले शोधण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने राज्यभरात ''ऑपरेश मुस्कान'' राबविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गायत्री बालिकाश्रम तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी यांची बैठक स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेण्यात आली. या मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली असून, अशा मुलांंना शोधून त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले जाणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, अनिता टेकाम, सुषमा घुगे आदींसह पथकातील कर्मचारी काम पाहत आहेत.
-- एक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश
हरविलेल्या मुलांना शोधण्याकरिता ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील आठ पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी दोन असे कर्मचारी सहभागी होऊन हरविलेल्या आणि भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध घेणार आहेत.
-- संपर्क करण्याचे आवाहन
जिल्ह्यात हरविलेले, रस्त्यावर, मंदिर परिसरात किंवा रुग्णालय परिसरात कुठेही अल्पवयीन मुले आढळल्यास पोलीस विभागाच्या ०७२४-२४४५३०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.