अकोला: किडनी तस्करी प्रकरणामध्ये आरोपींनी सहा किडनीदात्यांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना किडनी खरेदीदारांचे नातेवाईक असल्याचे भासविले. बनावट कागदपत्रे, शिक्के असल्यानंतरही औरंगाबाद व नागपूर येथील डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याने, त्यांचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे, असा ठपका ठेवत, डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अकोला पोलिसांनी राज्याच्या आरोग्यसेवा संचालकांना पत्र पाठवून परवानगी मागितली. परंतु दहा दिवस उलटूनही आरोग्यसेवा संचालकांनी पोलिसांना कोणतेही उत्तर कळविलेले नाही. त्यामुळे संबंधित डॉक्टर व समितीवरील कारवाई रखडली आहे. किडनी तस्करी प्रकरणामध्ये किडनीची खरेदी व विक्री करणार्या आरोपींना नागपूर व औरंगाबाद येथील चार डॉक्टरांनी साहाय्य केले. आरोपींकडून त्यांचे नावे आणि इस्पितळांची नावे समोर आल्याने, पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण करून त्यांचे जबाबसुद्धा नोंदविले. डॉक्टरांचा या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. परंतु डॉक्टर संरक्षण कायद्यामुळे पोलिसांना डॉक्टरांवर कारवाई करता येत नसल्यामुळे पोलिसांनी राज्य शासनाच्या आरोग्यसेवा संचालकांकडे पत्र पाठवून संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी आरोग्यसेवा संचालकांकडे पत्र पाठवूनही दहा दिवस उलटत आहेत. परंतु, या पत्राचे उत्तर अद्यापपर्यंंतही आरोग्यसेवा संचालकांकडून मिळालेले नाहीत. त्यामुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत. संबंधित डॉक्टर व किडनी प्रत्यारोपण अधिकार समितीवर कायदेशीर कारवाई कशी करावी. डॉक्टर व समितीवरील कारवाईसाठी आरोग्यसेवा संचालक उदासीन असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय पोलिसांना संबंधित डॉक्टर व समिती अध्यक्ष व सदस्यांच्या मुसक्या आवळणे कठीण होऊन बसले आहे.
डॉक्टरांवरील कारवाईबाबत संचालक उदासीन!
By admin | Published: December 31, 2015 2:37 AM