अकोला: औद्योगिक वसाहत परिसरातील श्रीहरी दालमिलमधील ऑपरेटरची अज्ञात हल्लेखोरांनी देशी कट्टय़ाने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रुंगठा टायर्ससमोर हा थरार घडला. संतोष घनश्याम शर्मा असे मृतकाचे नाव असून, अनैतिक संबधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली. शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील फेज-२ येथील श्रीहरी दालमिलमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपल्यानंतर शर्मा त्यांच्या एमएच ३0 झेड ३२९४ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होते. श्रीहरी दालमिलच्या बाजूलाच असलेल्या रुंगठा टायर्ससमोरच्या पहिल्याच वळणावर त्यांच्या दुचाकीचा वेग कमी होताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कानाजवळ देशी कट्टय़ाने गोळी झाडली. त्यानंतर लगेच दुसरी गोळी मस्तकावर झाडली. एमआयडीसीतील या धोक्याच्या वळणावर दुचाकीचा वेग कमी होताच अत्यंत जवळून या गोळ्या झाडण्यात आल्या. दोन गोळ्या लागताच शर्मा दुचाकीवरून खाली कोसळले. त्यामुळे चेहर्यावर व पोटावर जखमा झाल्या. या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. शर्मा यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. भर पावसात त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे; मात्र शर्मा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याची घटनास्थळावर चर्चा होती. गोळ्या झाडल्याच्या आवाज ऐकताच परिसरातील कामगार तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून शर्मा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये पाठविला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे, रामदासपेठचे सुभाष माकोडे, वाहतूक शाखाप्रमुख प्रकाश सावकार, सिटी कोतवालीचे अनिल जुमळे, सिव्हिल लाइन्सचे घनश्याम पाटील, एमआयडीसीचे शिरीष खंडारे यांच्यासह पोलीस अधिकार्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
दालमिलमधील ऑपरेटरची गोळ्या झाडून हत्या
By admin | Published: June 22, 2016 12:48 AM