अकोला : विदर्भ चेम्बर ऑफ कॉर्मस अँन्ड इन्डस्ट्रीची ८१ वी वार्षिक आमसभा रविवारी श्रावगी टॉवर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात शहरातील व्यापार्यांच्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ब्रजलाल बियाणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार बबनराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑनलाइन व्यापारामुळे रिटेलर व्यापारीवर्गात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत विदर्भ चेम्बर ऑफ कॉर्मस अँन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष रमाकांत खंडेलवाल यांनी व्यक्त केले. रिटेलर व्यापार्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात विदेशी कंपन्यांचे ऑनलाइन होणारे व्यवहार रिटेलर व्यापार्यांना अडचणीत आणीत आहेत. तसेच शासनाने लावलेला स्थानिक संस्था करदेखील या व्यापार्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एलबीटी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी व्यापार्यांना १ ऑगस्टची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे यावेळी रमाकांत खंडेलवाल यांनी सांगितले. मोठय़ा कंपन्यांच्या तुलनेत रिटेलर व्यापार्यांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. त्या अनुषंगाने रिटेलर व्यापार्यांचे मनोबल वाढविणे गरजेचे असल्याचे यावेळी रमाकांत खंडेलवाल यांनी सांगितले. अमरावती विद्यापीठात वाणिज्य शाखेतून स्नातक परीक्षेत प्रथम आलेल्या श्रद्धा बाबूराव गावंडे, द्वितीय आलेल्या कोमल सदोरामल पारवानी यांचा डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिंन्ह देउन सत्कार करण्यात आला.
विदर्भ चेम्बरच्या सभेत व्यापा-यांच्या समस्यांवर विचारमंथन
By admin | Published: June 29, 2015 2:01 AM