- नितीन गव्हाळेलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नुकतीच २0२0 नीटची परीक्षा आटोपली. त्यामध्ये देशभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. भारतात शासकीय, खासगी आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज असे तीनही मिळून एमबीबीएसच्या ७६ हजार ९२८ जागा आहेत. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, या जागा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एमबीबीएसचे स्वप्न पूर्ण होत नाही; परंतु देशात संधी मिळाली नाही तरी निराश व्हायचे कारण नाही. विदेशातसुद्धा वैद्यकीय शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. असे येथील शिक्षण तज्ज्ञ व शिक्षिका भुवन भास्कर वझिरे (गवाळे) यांनी सांगितले. त्यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद...
वैद्यकीय शिक्षणाच्या संधी विदेशात कुठे आहेत?यंदा नीटच्या परीक्षेला १५ लाख विद्यार्थी बसले होते. कोरोना काळातही ही संख्या मोठी आहे. अनेक पालक, विद्यार्थ्यांचे एमबीबीएस करण्याचे स्वप्न असते; परंतु प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. विद्यार्थी मेहनत करतात. परीक्षा रिपीट करतात. तरीही यश मिळत नाही; परंतु एक संधी संपली म्हणून निराश व्हायचे नाही. पुढील संधीचा लाभ घ्यायचा. देशात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर काय झाले, विदेशात सरकारी कॉलेजमध्ये कमी खर्चामध्ये एमबीबीएस करू शकतो. त्यासाठी रशिया, फिलिपिन्स, सेंट्रल अमेरिका, जॉर्जिया, किरगिस्तान, युक्रेन, कजाकिस्तान आदी देशांमध्ये एमबीबीएस करता येते.
विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील शुल्क विद्यार्थ्यांना पडवणारे आहे का?देशातील शासकीय, खासगी, डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये एमबीबीएसच्या जागा कमी आहेत; परंतु विदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षणाच्या भरपूर संधी आहेत; परंतु तेथील शुल्क, राहण्याचा, भोजनाचा खर्च आपल्याला परवडेल का, असा विचार आपण करतो; परंतु भारताच्या तुलनेत विदेशातील सरकारी कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम अर्ध्या खर्चामध्ये पूर्ण करता येते. २0 ते २५ लाख रुपयांमध्ये तेथील सरकारी कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.
विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचे काय?विदेशामध्ये बाहेरील देशामध्ये शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांसाठी कठोर कायदे केलेले आहे. विशेषत: यातील काही देश महिलाप्रधान आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नच निर्माण होत नाही. भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतील अत्यंत काळजी घेतली जाते. अत्यंत पोषक वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाते. निवासाच्या भौतिक सुविधांसह भारतीय खाद्यपदार्थ, भोजन उपलब्ध करून दिल्या जाते. वैयक्तिकरीत्या किचनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येते. विदेशात विद्यापीठे भरपूर आहेत; परंतु विद्यार्थी संख्या कमी असल्याने, त्या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो.शिक्षण पद्धती, भौतिक सुविधांबद्दल काय सांगाल?विदेशातील वैद्यकीय महाविद्यालये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. तेथे उच्चशिक्षित शिक्षक आहेत. पीएच.डी. धारक शिक्षक आहेत. आपल्यासारखी व्यवस्था, शिक्षण पद्धती तेथे नाही. तेथील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण, बारावीची परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. विद्यापीठे अधिक आणि विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना तेथे सहज प्रवेश मिळतो. १२ विद्यार्थ्यांमागे त्या ठिकाणी एक शिक्षक आहे. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जाही उच्च असल्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी विदेशातील वैद्यकीय शिक्षणाकडे वळत आहेत.