अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया शनिवारी ठरविण्यात आली होती; मात्र शासन निर्णयाचा आधार घेत या समायोजनाला विरोध करण्यात आला. त्यामुळे हे समायोजन पुढे ढकलण्यात आले आहे. समायोजनाला विरोध करणाऱ्या शिक्षकांवर आता कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात याबाबत खलबते झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.१८ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा हा कालावधी नसून, समायोजन करण्याचा कालावधी संपल्यामुळे २८ जून २०१९ रोजीच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार आणि ३० सप्टेंबर २०१९ रोजीच्या पटसंख्येनुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शिक्षक संघटनांच्या विरोधामुळे शनिवारी ठरलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पुढे ढकलण्यात आले होते. शनिवारी शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली; मात्र ही प्रक्रियेसाठी शिक्षकांनी सहकार्यच केले नाही, त्यामुळे या शिक्षकांना हा विरोध भोवण्याची चिन्हे आहेत.