अकोला : राज्यभरातील शासकीय रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर कंत्राटी तत्त्वावर खासगी कर्मचारी नेमण्याचा शासनाचा विचार आहे. शासकीय रुग्णालयातील सेवांच्या खासगीकरणाला विरोध करीत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा १९ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये राज्यभरातील १६ वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.शासकीय रुग्णालयातीत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची अनेक पद रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शासकीय रुग्णालयांची बिकट परिस्थिती आहे; परंतु ही पद भरण्याऐवजी शासनातर्फे सरकारी रुग्णालयातील रिक्त पदांवर खासगी कर्मचाºयांची नियुक्ती करणार आहे. याचा विरोध करीत रिक्त जागांवर निवृत्त कर्मचाºयांच्या वारसांना संधी द्यावी, तसेच बदली कामगारांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे; मात्र या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संघटनेच्या मते, सरकारी रुग्णालयात बदली म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे; मात्र सरकारद्वारे केवळ आश्वासने दिली जात आहेत. आता राज्य सरकार रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. या खासगीकरण धोरणाच्या विरोधात सरकारी रुग्णालय राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे १९ आॅगस्ट रोजी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या आहेत प्रमुख मागण्या
- सातवा वेतन आयोग लागू करा.
- रुग्णालयातील सेवांचे खासगीकरण थांबवा.
- जुनी पेन्शन योजना लागू करा.
- वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या रिक्त जागा भरा.
- पाच दिवसांचा आठवडा करा.
- निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.
- अनुकंपा भरती करा.
- महिला कर्मचाºयांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा द्या.
- १ जानेवारी २०१७ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने द्या.
- वेतन त्रुटीचे निराकरण करा.