अकोला: महापालिकेच्या सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. मंजूर ठराव शासनाकडे पाठवण्यासाठी भाजपने येत्या २२ नोव्हेंबर रोजी मनपात विशेष सभेचे आयोजन केले आहे. यामुळे मनपातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले असून, सभागृहातील चर्चेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.प्रभाग क्रमांक १ मध्ये मंजूर केलेला एलईडी पथदिव्यांचा ४० लक्ष रुपये निधी या प्रभागातील नगरसेवकांना कोणतीही पूर्व सूचना न देता दुसऱ्या प्रभागात वळती केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी ५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. या मुद्यावरून महापौर विजय अग्रवाल व साजिद खान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान आखाड्यात झाल्याने सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. मंजूर ठरावावर शासनाने तातडीने कार्यवाही करावी, यासाठी येत्या २२ नोव्हेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साजिद खान सभागृहात वारंवार असभ्य वर्तन करतात, असे प्रशासनाच्या टिप्पणीत नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त भूमिगत गटार योजनेसाठी पीडीकेव्ही प्रशासनाची ५ एकर जमीन उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. यांसह विविध विषयांचा समावेश आहे.काँग्रेसच्या गोटात ‘कही खुशी कही गम’मनपात काँग्रेसचे एकूण १३ नगरसेवक आहेत. सत्ताधारी भाजपने थेट विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनाच सदस्य पदावरून अपात्र करण्याचे स्पष्ट केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण असल्याचे बोलल्या जात आहे.