लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातून राजस्थान राज्यातील पिलानी येथे पाठविलेले पार्सल फोडून त्यात आक्षेपार्ह साहित्य टाकून एकास मानसिक त्रास देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अकोला पोस्ट विभागाने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि दहा हजार रुपये नुकसान भरपाईपोटी द्यावे, असा दावा अकोल्यातील ग्राहकाने केला आहे.अकोल्यातील लक्ष्मी नगरात राहणारे अविनाश वर्हाडपांडे यांचा मुलगा विक्रम हा राजस्थान येथील पिलानी येथे शिक्षण घेत आहे. घरी केलेले खाद्यपदार्थ मुलाला पाठविण्यासाठी त्यांनी पार्सल तयार केले. २४ मार्च रोजी हेड पोस्ट ऑफीसच्या रजिस्टर पोस्टाने या परिवाराने ते पार्सल पिलानी येथील पत्त्यावर पाठविले. सदर पार्सल विक्रमला २ एप्रिल रोजी मिळाले. प्रथमदर्शनी पार्सल नीटनेटके दिसत असल्याने होस्टेलमध्ये राहत असलेल्या विक्रमने ते पार्सल रूममध्ये ओपन केले. तेव्हा मात्र विक्रमला पार्सल फोडलेले आढळले. सोबतच या पार्सलमध्ये काही आक्षेपार्ह साहित्यही आढळले. हिरव्या रंगाची माळ आणि दोन छोट्या आकाराचे ताम्रपत्र आढळले. सोबतच पूजेचा विधी लिहलेले पेपर होते. या प्रकाराने विक्र म हादरला, त्याने लगेच ही माहिती अकोल्यातील परिवारास कळविली. त्यानंतर विक्रमने पिलानी येथील पोस्ट विभागात, तर त्याचे वडील अविनाश वर्हाडपांडे यांनी अकोला पोस्ट विभागात लेखी तक्रार नोंदविली. ७ एप्रिल रोजी जेव्हा अविनाश वर्हाडपांडे यांनी पोस्ट विभागात धाव घेतली, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे आता झालेल्या प्रकाराबाबत वर्हाडपांडे यांनी अकोला पोस्ट विभागावर दहा हजार रुपये नुकसान भरपाईचा दावा केला आहे. आता या दाव्याची दखल पोस्ट विभाग कशी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अकोला पोस्ट कार्यालयातच पार्सल फुटल्याचा संशयअकोला हेड ऑफीसच्या पोस्ट कार्यालयातच पार्सल फुटल्याचा संशय वर्हाडपांडे यांनी व्यक्त केला आहे. कारण पदार्थ ठेवलेल्या बॉक्सला छिद्र आढळून आले आहे. आतील पदार्थ काढून त्यात आक्षेपार्ह साहित्य टाकून ते जसेच्या तसे पॅकिंग करण्यात आले. ही कसब केवळ पोस्टाचीच असू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.