अकोला: शहरवासियांकडून मालमत्ता कर वसूलीसाठी महापालिकेने नियमबाह्यरित्या स्वाती एजन्सीची नियुक्ती केली. या एजन्सीकडून थकीत कर जमा करण्यासाठी नागरिकांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आराेप करीत साेमवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट)वतीने प्रभारी उपायुक्त निला वंजारी यांच्या कक्षात ठिय्या आंदाेलन केले. तसेच मालमत्ता कर विभाग व जलप्रदाय विभाग कार्यालयाला कुलूप ठाेकत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
महापालिका प्रशासनाने नागरिकांजवळून मालमत्ता कर वसूलीसाठी स्वाती एजन्सीची नियुक्ती केली. याबदल्यात एजन्सीला चक्क साडेआठ टक्के दरानुसार देयक अदा केले जाइल. निकष,नियम बाजूला सारत मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून थकीत मालमत्ता कर वसूलीसाठी अकाेलेकरांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आराेप करीत शिवसेनेचे (ठाकरे गट)शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मनपाच्या प्रभारी उपायुक्त निला वंजारी यांच्या कक्षात ठिय्या आंदाेलन छेडण्यात आले.
प्रशासनाने एजन्सीच्या मनमानी कारभाराला आळा घालून साडेआठ टक्के कमिशन न देता त्यातून गरीब नागरिकांना शास्ती माफ करावी, मनपा कर्मचाऱ्यांमार्फत कर वसुली करावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदाेलनात माजी नगरसेविका मंजूषा शेळके, वर्षा पिसाेडे, सुनिता श्रीवास, गजानन बोराळे, अनिल परचुरे, सुरेंद्र विसपुते, अंकुश शिंत्रे, सतीश नागदिवे, राजेश इंगळे, देवा गावंडे, अविनाश मोरे, बाळू ढोले, पंकज बाजोळ, रोशन राज, आकाश राऊत, योगेश गवळी, चेतन मारवाल, श्याम रेडे, अमित भिरड, राजेश कानापुरे, अभिषेक मिश्रा, सुनील दुर्गिया, रामेश्वर पडुलकर, संजय पिल्लू आदी उपस्थित हाेते.
खुर्च्यांची केली ताेडफाेडजलप्रदाय विभागाचे अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. कर विभागातील कर्मचाऱ्यांना काेणतेही काम शिल्लक नसल्याचा आक्षेप घेत शिवसैनिकांनी या विभागाला कुलूप ठाेकत अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांची ताेडफाेड केली.