अकोला: जिल्ह्यात शनिवार, रविवार दोन दिवस ढगाळ हवामान दिसून आले. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवार, दि.८ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट दिला असून, पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या धास्तीने सोंगणीला आलेल्या पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याला अपेक्षित पाऊस पडला नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने यावर्षी सिंचन प्रकल्प, धरण, ओेढे, नद्या, नाले, कोरडे पडले आहेत. आता उन्हाळ्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ यामुळे आंबा, फळपिकांचे नुकसान हाेण्याची माेठी शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्वारीचे पीक सोंगणीला, शेतकऱ्यांचा जीव टांगणीलाजिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. सध्या शेतशिवारात रब्बी ज्वारी सोंगणीला आली असून, शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यात अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यंदा रब्बी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दिल्याचे चित्र असून, यंदा प्रथमच पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट! पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज, शेतकरी धास्तावला
By रवी दामोदर | Published: April 07, 2024 7:50 PM