प्रशांत विखे
तेल्हारा: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजार हा परिसर फळबागमधील जसा ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जातो, त्याच धर्तीवर तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या बहुतांश गावात संत्रा पिकांची लागवड झाली असून, अजूनही त्यात वाढ होणार असल्याने भविष्यात हा परिसर ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखल्या जाईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील बहुतांश भाग हा सातपुडा पर्वताच्या खाली असल्याने येथील जमीन खरीप व रब्बी पिकांमधील मुख्य पिकांना साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची प्रगती न झाल्याने खंडाळा, वारी,वारखेड, पिंपरखेड, सौंदळा, बोरव्हा, सदरपूर, चितलवाडी, करी रूपागड, करी अडगाव येथील शेतकरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृषी विभागाने परिसरातील जमिनीचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. सर्वसाधारण शेतकरी हा फळबागेकडे आकर्षित न होण्यामागे अनेक कारणे असताना तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून या परिसरात संत्रा लागवड करण्यास प्राेत्साहित केले. यामध्ये शेतकरी यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. ४० वर्षात जेवढी संत्रा लागवड या परिसरात झाली नाही, त्यापेक्षा जास्त लागवड दोन ते तीन वर्षात या भागात झाली. अजूनही या भागात फळबाग लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
------------------बाॅक्स----------------
२०१८ पर्यंत ३०० हेक्टरवर हाेती संत्रा लागवड
१९९१ ला प्रथम संत्रा लागवड तालुक्यात झाली हाेती. २०१८ पर्यंत केवळ ३०० हेक्टरवर संत्रा लागवड झाली होती, मात्र सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षात तब्बल ४५० हेक्टरवर लागवड झाली तर मागील दोन वर्षातच ४२१ हेक्टरवर संत्रा लागवड झाली आहे.
------------------काेट----------------
तेल्हारा परिसरातील जमिनीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी त्याला साथ देत संत्रा लागवड केली. या क्षेत्रात वाढ करून अमरावती जिल्ह्यातील संत्र्यापेक्षा जास्त चविष्ट हा संत्रा राहणार असल्याने याची मागणीसुद्धा जास्त राहील. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ हाेऊन तालुक्याच्या विकासामध्ये भर पडेल.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा