अकोला: अकोला व अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील संचित व अभिवचन रजेवर बाहेर आलेले २२ कैदी अनेक महिने उलटून गेल्यानंतरही कारागृहात परतले नसल्याने, त्यांना तातडीने अटक करण्याचा आदेश बुधवारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ठाणेदारांना दिला. अकोला व अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या अनेक गुन्हय़ातील २२ कैदी संचित व अभिवचन रजेवर अनेक महिन्यांपासून बाहेर आले; परंतु हे कैदी अद्यापपर्यंत कारागृहामध्ये परतले नाहीत. यासंबंधी दोन्ही कारागृहातील अधीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून फरार २२ कैद्यांचा शोध घेण्यासंदर्भात विनंती केली होती. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनीसुद्धा अकोला पोलीस अधीक्षकांना पत्र दिले होते. या पत्रानुसार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरातील पाच पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या परिसरात राहणारे फरार कैद्यांना तातडीने अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला. फरार कैद्यांची नावे व त्यांच्या राहण्याच्या ठिकाणचा पत्तासुद्धा ठाणेदारांना कळविण्यात आला आहे.
२२ कैद्यांना अटक करण्याचा आदेश
By admin | Published: March 12, 2015 1:41 AM