अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण व गोकूळ यशवंत गोपनारायण या दोघांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या फ ौजदारी प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अन्वये चौकशीचा आदेश दिला आहे.शासकीय दूध योजना येथे अधीक्षक पदावर कार्यरत असलेले कैलास चिंतामन थोरात यांना सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या गोकूळ गोपनारायण यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारींच्या विभागीय चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशकरणे बंधनकारक होते. त्यानुसार थोरात यांनी चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर गोकूळ गोपनारायण यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आकसबुद्धीने गोपनारायण यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली अभिप्राय मिळवित थोरात यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या. यावर थोरात यांनी पोलीस ठाण्यांमध्ये खुलासा सादर केल्यानंतर वास्तव समोर आले; मात्र डॉ. चव्हाण यांनी दस्तावेजांची तपासणी न करता तसेच माहिती अधिकारी नसताना माहिती दिल्याने हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी संहितेच्या कलम २०२ अन्वये सिव्हिल लाइन्स पोलिसांना चौकशीचा आदेश दिला आहे. सदर प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला असून, पुढील सुनावणी ११ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी थोरात यांच्यावतीने अॅड. राजेश जाधव, अॅड. सुरेखा बोरसे व अमोल सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.