अकोला: संघटित हाेऊन टाेळीने गुन्हे करणाऱ्या पाच अट्टल गुन्हेगारांना एक वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश गुरुवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जारी केला आहे. सराइत तसेच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पाेलिस प्रशासन सरसावल्याचे समाेर आले आहे.
सचिन उर्फ डी. जे. रामराव वानखडे (२३), मिलींद गजानन डाबेराव (२६) दोन्ही रा. कोळासा ता. बाळापूर तसेच गुलाम सादीक गुलाम दस्तगीर (३८), सैयद वजीर सै. नजीर दाेन्ही राहणार खैर मोहम्मद प्लॉट नेहरु नगर, अकोला व आरीफ मलीक अखतर मलीक (२३ रा. मेरठ ह.मु. सुभाष चौक, अकोला) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. उपराेक्त आराेपी टाेळी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत असल्याची बाब जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गांभीर्याने घेतली. आराेपींच्या विराेधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्याकडून समाजाला व सर्वसामान्य जनतेला त्रास हाेत असल्याची नाेंद आहे. आराेपींवर प्रतिबंधात्मक कारवाइ व ताकीद दिल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा हाेत नसल्याचे पाहून ‘एसपी’सिंह यांनी आराेपींच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश बाळापूर पाेलिसांसह अकाेला पाेलिसांना दिले हाेते. त्यानुषंगाने पाच आराेपींविराेधात कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्हयातून एक वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा पोलिस अधिक्षकांनी मंजूरी दिली.
कुंडली जमा करण्याचे निर्देशजिल्ह्यासह शहरात संघटित हाेऊन टाेळीने गुन्हा करणारे, खंडणीखाेर, जीवे मारण्याची धमकी देणारे तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या गावगुंडांचा कठाेरपणे बंदाेबस्त करण्याचे निर्देश जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिले आहेत. अशा गावगुंडांची कुंडली जमा करण्याची सूचना ‘एसपीं’नी दिली असून यंत्रणा कामाला लागल्याची माहिती आहे.