अकोला : न्यायालयीन प्रकरणात सहायक शिक्षणसेवकाला वेतनश्रेणी मंजूर करण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फायलीवर नकार असताना त्यांचा होकार असल्याचे भासवून वेतनश्रेणी लागू करण्याचा आदेश परस्पर तयार करणाऱ्या शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक सरोज तिडके यांना शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या नोटीसचे स्पष्टीकरण महिनाभरानंतरही न दिल्याने आता कारवाईचा प्रस्ताव तयार केला जात आहे.न्यायालयीन प्रकरणानुसार, शिक्षणसेवक शाहिद इकबाल यांना भरती प्रक्रियेतील रुजू होण्याच्या दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करण्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फाइलवरच नकार दिला. जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत रुजू न केल्याने त्याविरोधात संबंधित शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने रुजू करून घेण्याचा आदेश दिला. पदस्थापना देतानाच त्या शिक्षणसेवकाला भरती प्रक्रियेतील उमेदवार ज्या दिवशी रुजू झाले, तेव्हापासून वेतनश्रेणी देण्याचेही फाइलमध्ये नमूद केले; मात्र भरती प्रक्रियेचे वर्ष ते आता पदस्थापना मिळण्याच्या कालावधीत शिक्षणसेवकाने कामच केले नाही, तर वेतनश्रेणी देण्याचा प्रश्न नाही, असे नमूद करीत हा मुद्दा बाजूला ठेवला. दरम्यान, शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक सरोज तिडके यांनी मूळ फाइलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मंजुरी दिली. त्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याचा आदेश परस्पर तयार केला. त्या आदेशाची आवक-जावक नोंदवहीत संबंधित लिपिकाच्या परस्पर नोंदही केली. तो आदेश शिक्षणसेवकासह पंचायत समितीला पाठविला. हा गंभीर प्रकार शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्या निदर्शनास आला. या प्रकाराबाबत तिडके यांनी नियम व शिस्तीचा भंग केला आहे, तसेच गंभीर स्वरूपाच्या चुका केल्याने कारवाई का करू नये, अशी नोटीस ११ फेब्रुवारी रोजीच दिली. त्यावर तिडके यांनी अद्याप स्पष्टीकरण दिले नाही.- आंतरजिल्हा बदलीतही पदस्थापनाविशेष म्हणजे, सहायक शिक्षक बुंदे यांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणातही फाइलवर मुख्य कार्यकारी अधिकाºयांची मंजुरी नव्हती. तरीही त्या शिक्षकाला पदस्थापना देण्याची स्वच्छ प्रत तयार करून ती पाठविण्यात आली. सहायक शिक्षकांच्या स्थायित्व प्रकरणातही मोठ्या प्रमाणात अनियमितता करणे, वरिष्ठांची दिशाभूल करून अनियमितता करण्याचे अनेक प्रकार घडल्याने तिडके यांच्यावर कारवाईसाठी नोटीस देण्यात आली. विविध अनियमिततेसंदर्भात दिलेल्या नोटीसचे स्पष्टीकरण अद्याप प्राप्त नाही. त्यामुळे आता कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केला जाईल.- वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.