अकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलेला अभ्यासक्रम अनुदान नसल्याने दोन वर्ष बंद होता. यावर्षी पुन्हा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सेंद्रिय शेती विकास करण्यासाठी प्रशिक्षित शेतकरी, उद्योजक तयार करणार्या या अभ्यासक्रमासाठी अनुदानाची निकड आहे. शेतकर्यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहेत. सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरदेखील भर देण्यात येत आहे. सेंद्रिय पदार्थांंना उपलब्ध असलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादने, पदार्थांंना मोठा वाव आहे. राज्य सरकारने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले आहे. असे असले तरी या शेतीचा प्रसार अधिक गतीने होण्यासाठी सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम महाविद्यालयाला अनुदानाची नितांत गरज आहे. या पदविका अभ्यासक्रमासाठी वर्षाला २0 ते ३0 हजार रुपये एका विद्यार्थ्यावर खर्च अपेक्षित असतो. तथापि कृषी विद्यापीठाकडे हा खर्च करण्याची ऐपत नसली तरी हा अभ्यासक्रम चालविण्यात येत आहे. यावर्षी ४0 विद्यार्थ्यांंना प्रवेश देण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेणार्या तीन तुकड्या या अगोदर बाहेर पडल्या आहेत. या अभ्यासक्रमाद्वारे विदर्भात प्रशिक्षित शेतकरी निर्माण करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. अकोला जिल्हय़ातील शेतकर्यांनी या माध्यमातून स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. एम भाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा अनुदानाअभावी बंद झालेला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात आला असल्याचे सांगीतले. ४0 विद्यार्थ्यांंना प्रवेश देण्यात आला आहे. या अगोदर ६८ शेतकरी, विद्यार्थ्यांंनी सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रम नव्याने सुरू!
By admin | Published: August 25, 2015 1:51 AM