अकोला : स्वच्छता हीच सेवांतर्गत गुजरातमधील साबरमती येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी अकोला जिल्ह्यातील शौचालयातील सोनखत पाठविले जाणार आहे. त्यासाठी कापडी पिशवीत पॅकिंगसह विविध प्रक्रियांसाठी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहणार आहेत.केंद्र शासनाने या उपक्रमांसंदर्भात आदेश दिला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून सोनखत पाठविले जाणार आहे. स्वच्छता हीच सेवा, या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत अधिकाºयांची समिती गठित झाली आहे. खरेदीविषयक अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. त्यामध्ये कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, तर सदस्य पदावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. एस. मानमोठे, कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे, युनिसेफ सल्लागार जयंत देशपांडे, मुख्यमंत्री फेलो शुभम बडगुजर, संतोष पाटील, सचिव म्हणून स्वच्छ भारत मिशनचे लेखाधिकारी सु. जा. सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी अंदाजपत्रक तयार करणे तसेच खरेदीची कामे कार्यकारी उपाध्यक्ष यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. यादरम्यान स्वच्छ भारत मिशन कक्ष व जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांच्या रजा, सुटी २ आॅक्टोबरपर्यंत रद्द केल्याचेही आदेशात म्हटले आहे.