अकोला : शेतीच्या शाश्वततेसाठी ‘जैविक शेती’ हाच सर्वोत्तम पर्याय असून, जैविक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाच्या विक्री, प्रचार, प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’मुळे ही चळवळ अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनअंतर्गत स्थापन झालेल्या ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’ या नावाने महासंघ स्थापन केला, तसेच त्याच महासंघाच्या ‘मॉम’ या ब्रँडचीही निर्मिती केली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा. धोत्रे हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, महासंघ ऑरगॅनिक मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, श्रीमती पद्माताई पोहरे यांची उपस्थिती होती, तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या सहसचिव श्रीमती निरजा, जैविक शेती मिशनच्या सल्लागार वंदना द्विवेदी, श्रीमती बिनिता शहा, पी.सी. नायडू, संचालक आत्मा किसनराव मुळे, सेंद्रिय शेतीचे राज्य समन्वयक कृषी आयुक्तालय पुणे सुनील चौधरी, प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, उपसंचालक अशोक बाणखेले, तसेच महासंघाचे शेतकरी सभासद हे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
यावेळी खा. धोत्रे यांच्या हस्ते महासंघाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले, तर श्रीमती निरजा यांच्या हस्ते व्यापार माहितीपत्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक आरिफ शाह यांनी केले. कार्यक्रमास महासंघाचे पदाधिकारी, सभासद शेतकरी उपस्थित होते.