अकाेला : आगामी २०२४ची निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून काॅंग्रेसची संघटनात्मक बांधणी केली जात असून, अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली.
पटाेले हे सध्या विदर्भाच्या दाैऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी अकाेल्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अकाेल्यातील काॅंग्रेस पक्षात दमदार नेते आहेत; मात्र समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवते. येणाऱ्या काळात सर्व चुका दुरुस्त करून नव्याने फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर काेराेनाचे संकट कायमच हाेते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जाता आले नाही, आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन संघटनेची बांधणी करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला व बालविकासमंत्री यशाेमती ठाकूर, आमदार कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लाेंढे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चाैधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी मंत्री अझहर हुसेन, माजी आमदार नितकाेद्दीन खतीब, मनपा गटनेते साजीद खान पठाण, डाॅ. सुधीर ढाेणे, प्रकाश तायडे, मदन भरगड, प्रदीप वखारिया आदी उपस्थित हाेेते. संचालन कपिल रावदेव यांनी केले.
हमीभाव; शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसली
केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा अत्यल्प आहे. एकीकडे पेट्राेल, डिझेलचे भाव वाढत असतानाही दुसरीकडे हमीभाव मात्र ५ टक्केही वाढविलेले नाहीत. वास्तविक दरवर्षी किमान १० टक्के दरवाढ अपेक्षित असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या ताेंडाला पाने पुसत आहे, असा आराेप पटाेले यांनी केला.