अकोला: आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन व महाराष्ट्राच्या बुद्धीबळ क्षेत्रातील राजेंद्र कोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त, ऑनलाईन बुद्धीबळ पटाच्या माध्यमातून पीआर चेस वर्ल्ड व राजेंद्र कोंडे मित्र परिवाराच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय फिडे पंच पवन कन्हैयालाल राठी यांनी एका दिवसात (२४ तासांत) १८४ स्पर्धांचे नियोजन करून भारतीय बुद्धिबळ क्रीडा प्रकारात इतिहास रचला. त्यांच्या कार्याची दखल घेत, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद केली.
अकोला जिल्ह्यातील पहिले आंतरराष्ट्रीय फिडे पंच पवनराठी यांच्या कल्पकनेतून या उपक्रमाचा उगम झाला आहे. सध्याच्या ऑनलाईन स्पर्धांसाठी खेळाडूंमध्ये पहिली पसंती असलेल्या लिचेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या माहिती पत्रकात नमूद केल्या नुसार योग्य व सोप्या प्रकारे नाव नोंदणी करून या स्पर्धांमध्ये निशुल्क भाग घेण्याची संधी सर्व स्पर्धकांना उपलब्ध करून देण्यात आली होती.
या विक्रमी बुद्धिबळ स्पर्धांची सुरुवात २० जुलैला मध्यरात्री १२ वाजता सुरू झाली होती व या स्पर्धांचा शेवट हा २१ जुलैला मध्यरात्री १२ वाजता झाला होता. २० जुलै च्या मध्यरात्री १२ वाजता पहिली स्पर्धा सुरू झाली होती. त्या नंतर लगेचच १२.०५ ला दुसरी स्पर्धा सुरू झाली. अशा प्रकारे १२ ते १ या पहिल्या तासाला १२ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सुरू झालेल्या स्पर्धांची साखळी कायम राहून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ११:५५ वाजता या स्पर्धेतील उपक्रमाचा शेवट झाला. त्यावेळी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली होती. प्रत्येक स्पर्धा निशुल्क होती व या स्पर्धांमधील प्रथम ३ क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे ठेवली होती. बक्षिसांची एकूण संख्या ५५२ होती. स्पर्धेतील स्पर्धकांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून प्रत्येक स्पर्धकाला सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
बुद्धीबळ स्पर्धेमध्ये ५९१९ खेळाडूंचा सहभाग!
ऑनलाइन खुल्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारतासह क्युबा, अमेरिका, रशिया, श्रीलंका, कॅनडा, फ्रान्स, कझाकिस्तान, अर्मेनिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, इराण, फिलिपाईन्स, वेतनाम, इजिप्त आणि बांगलादेश या १७ देशातील ग्रॅंडमास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स, महिला इंटरनॅशनल मास्टर्स आणि फिडे मास्टर सह एकूण ५९१९ खेळाडूंनी सहभाग घेतला व भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक नव्या विक्रमाची नोंद झाली. २४ तासांत १८४ स्पर्धांचे आयोजन करणारे पवन राठी हे पहिले भारतीय आयोजक ठरले आहेत.