अकोला: महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहु क्षेत्रातील पुर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यावर तसेच त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेउन मुख्यमंत्री व जलसंधारण व रोहयो मंत्री यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्यालाा त्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यात एप्रिल २०१८ पर्यंत कमीत कमी दहा हजार शेततळे पुर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी या योजनेतंर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेततळ्याचा लाभ घेणारे शेतकरी व जास्तीत जास्त शेततळे तयार करणाऱ्या ग्रामपंचायतीचा गौरव केला जाणार आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले आहे.सदर योजनेमध्ये ३० एप्रिल २०१८ पर्यंत जे शेतकरी स्वत: सहभागी होउन शेततळे पुर्ण करतील, त्या शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात येईल. तसेच या योजनेतून १ मे २०१८ पर्यंत ज्या गावांत जास्त शेततळे होतील, त्या ग्राम पंचायतीला जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधुन प्रथम पारितोषिक म्हणून पाच लाख रुपये, तर दुसरे पारितोषिक दोन लाख रुपये व तिसरे पारितोषिक एक लाख रुपये देण्यात येईल.स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता संबंधित उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क करावा. तसेच सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता शेवटची तारिख दिनांक ३० जानेवारी २०१८ ही आहे. स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या ग्राम पंचायतीला गाव हागणदारी मुक्त करणे, गावातील शाळा डिजीटल करणे, शेततळयाची कामे जास्तीत जास्त लोक सहभागातून करणे आवश्यक आहे.सदर स्पधेर्चा निकाल हा दिनांक १ मे २०१८ रोजी घोषित करण्यात येईल. तसेच या कामामध्ये जे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होउन जास्तीत जास्त शेततळयाची कामे पुर्ण करून घेतील त्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या दिनांक १ मे २०१८ रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कळविले आहे.