धनंजय कपाले, ऑनलाइन लोकमत
वाशिम : तिला जवळचं असं कोणीच नाही, सोबतीला फक्त कपड्यांचं गाठोडं अन् पाण्याच्या बाटल्या. प्रसूतीच्या असह्य वेदनेने कळवळताना आपल्याला काय होतंय याचीही तिला कल्पना नव्हती. तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, जन्मदात्रीच मतिमंद असल्याने या बाळाचे संगोपन करण्याचा संकल्प बुलडाण्याच्या ‘ममता’ शिशु गृहाने हाती घेतला. मन हेलावणारी ही अवस्था एका अनाथ मतिमंद महिलेच्या वाट्याला आली.
सहा महिन्यापुर्वी मांगुळ झनक येथील शेतशिवारात एक मतिमंद महिला प्रसुतीने विव्हळत असल्याचं नावली येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. ग्रामस्थांनी माणुसकीचा परिचय देत या महिलेला प्रसुतीसाठी मांगुळ झनक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती केलं. सदर महिला ही मतिमंद असल्याने तिला नाव विचारले असता ती आपले नाव सांगु शकली नाही. या मतिमंद महिलेला दिवस कधी गेले तेही समजले नाही. मांगुळ झनकला ही महिला कधी आली हे देखील नेमके सांगता येत नाही. अशा अवघड परिस्थितीत ओढवलेल्या या मतिमंद महिलेने एका मुलाला जन्म दिला.
मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला आवश्यक असणारा ‘आहार’ ती देऊ शकत नव्हती. त्या मुलाला व तिला गावातीलच काही समाजसेवकांनी कपडेलत्ते देऊन बाळाच्या पुढील संगोपनासाठी वाशिम येथील बाल कल्याण समिती अधिका-यांना कळविले. बाल संगोपन अधिका-यांनी या बाळाची बुलडाणा येथील ममता शिशुगृहात संगोपनासाठी रवानगी केली.
अनाथ असलेल्या या बालकाला मातृत्वाची ‘ममता’ शोधण्यासाठी शिशुगृहातील अधिकारी या महिलेच्या कुटूंबीयांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महिलेच्या नातेवाईकांचा शोध लागल्यास अनाथ झालेल्या बाळाला पालक मिळतील अशी अपेक्षा शिशु गृहातील अधिका-यांनी व्यक्त केली आहे.