अकोला : संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढवित या योजनेमध्ये अनाथ मुलांना समावून घेत भविष्यात त्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचाही लाभ देण्याबाबत अकोल्यात अॅक्शन प्लॅन तयार होत आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकारातून याची सुरुवात झाली असून, अनाथ मुलांच्या नावाने अंत्योदय रेशन कार्डही बनविण्यात येणार आहे. असे उपक्रम राबविणारा अकोला हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरणार आहे.राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अनाथ मुलांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या संदर्भात अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये हक्काचे घर देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील खुल्या भूखंडांवर आरक्षणाची तरतूद करण्याचे तसेच अनाथ, अपंग, दुर्धर आजारी लोकांना भूखंड राखीव ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.भविष्यात ही मुले १८ वर्षाची झाल्यावर तिथे स्थायिक होऊ शकतात, तसेच बालकांना व्यावसायिक शिक्षणाकडे वळविण्याचा कल राहणार आहे. मुलांना उदारनिर्वाहाकरिता उद्योग उभारणीकरिता साहाय्य देणे, अनाथ मुलांना स्पर्धा परीक्षेकरिता उत्तेजित करणे, सर्व अनाथ मुलांची बौद्धिक क्षमतानुसार विभागणी करणे, खासगी अनाथ अपंग दिव्याग मुलांच्या आश्रमाला शासनामार्फत धान्य पुरवठा करणे, खासगी आश्रमाला जागा उपलब्ध करून देणे, खासगी आश्रमाला मनपा टॅक्स मालमत्ता करामध्ये सूट देणे आदी संदर्भात नियोजन सुरू आहे
पालकमंत्री म्हणून अकोला जिल्ह्यात इतर जिल्ह्यापेक्षा वेगळे काम करता येईल यासाठी माझा आग्रह आहे. दिव्यांगांसाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष आहे; मात्र आता महिला व बालकल्याण विभागाकडून आढावा घेऊन अनाथ व विशेष बालकासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग ठरेल.- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडूराज्यमंत्री, शालेय शिक्षण तथा पालकमंत्री, अकोला