मूर्तिजापूर : शहरातील व्यापाऱ्यांकडून प्रतिष्ठाने उघडी ठेवल्या जात असून, शहरात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे. दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. शहरातील गर्दी कमी करण्यासाठी कडक निर्बंध लावून अत्यावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवून, इतर प्रतिष्ठानांवर कारवाई करून बंद करावी, अशी मागणी पत्रकार संघाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दि. १ मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील व्यावसायिक परवानगी नसतानाही दुकाने बिनधास्त सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने येथील व्यापारी बिनधास्त व्यवसाय चालवित आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाचा वापर करून इतर व्यावसायिक दुकाने उघडून बिनधास्त व्यवसाय करीत आहेत. काही दुकानदार दुकानाचे शटर उघडून ग्राहकांना आतमध्ये ठेवून व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. दि. २ मेपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही प्रकारची दुकाने उघडली जाणार नाही, याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशा मागणीचे एक निवेदन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, पोलीस निरीक्षक सचिन यादव यांना देऊन तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा दुकानदारांविरुद्ध प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करून दुकाने सील करण्याची मागणीही शहरातील पत्रकारांनी निवेदनातून केली आहे. यावेळी अनिल अग्रवाल, विकास सावरकर, दीपक अग्रवाल बबलू यादव, विलास मुलमुले, प्रा.दीपक जोशी, प्रा.अविनाश बेलाडकर, संतोष माने, गौरव अग्रवाल, उमेश साखरे, विलास नसले, प्रा.एल.डी.सरोदे, संजय उमक, अंकुश अग्रवाल, रिजवान सिद्दीकी, विशाल नाईक, नरेंद्र खवले, नीलेश सुखसोहळे, सुमीत सोनोने, जयप्रकाश रावत, प्रकाश श्रीवास यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती.