रवी दामोदर
अकोला : अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानापोटी मदतही जाहीर करून वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही अकोट व तेल्हारा तालुक्यातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचा मोर्चा दि. २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
खरीप हंगामात सुरुवातीला पिके शेतात डोलत होती. यंदा चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन शेती खरडून गेली होती. या नुकसानापोटी राज्य शासनाने तत्काळ सर्व्हे करून मदत दिली. मात्र अद्यापही अकोट तालुक्यातील अकोलखेड, अंबोडा यासह इतर भागातील अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गत चार महिन्यांपासून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांनी शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश उंबरकर, मकसूद मुल्लाजी, नीलेश नेमाडे, मोहन खिरोडकर, ज्ञानेश्वर रेचे, अरूण रेचे, मानिक जामडे, प्रवीण केदार, विलास ताथोड, डाॅ. नीलेश पाटील, अशोक टिपले, दीपक तळोकार, नारायण बायवार, अरूण राऊत, राम आखरे, अनुराधा जामडे, किरण सावळे, किरण कौठकर, वैशाली कावरे, योगिता बायवार, मंदा निचळ आदींसह शेतकरी व महिला उपस्थित होते.
....अन्यथा तीव्र आंदोलन
गत चार महिन्यांपासून नुकसानग्रस्त शेतकरी मदतीसाठी भटकंती करीत आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा होता. त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे, अन्यथा शेतकरी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी याप्रसंगी दिला.