अकोला: १५ व्या वित्त आयोगांतर्गत राज्यात नव्याने नागरी आरोग्य केंद्र सुरू होत आहेत. त्यापैकी महापालिका क्षेत्र आणि तालुकास्तरावर किमान एक हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राहणार आहे. अकोल्यातही सात आपला दवाखान्यांना मंजुरी मिळाली असून १ मे रोजी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून या दवाखान्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी मंजुर झालेल्या सात आपला दवाखाना पैकी एक महापालिका क्षेत्रात, तर उर्वरीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक या प्रमाणे राहणार आहे. महापालिका क्षेत्रात हा दवाखाना शिवनी येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासह तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नव्याने दवाखाना सुरू करण्यात येत आहे. आपला दवाखान्यासाठी एक डॉक्टर, एक स्टाफ नर्स, आरोग्य मित्र, अटेंडन्स आणि एक स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. दवाखाना दुपारी २ ते रात्री १० वाजतापर्यंत सुरू राहणार असून यामध्ये रुग्णांना प्रथमोपचार दिला जाणार आहे.
कोणते उपचार होतील?
आपला दवाखानामध्ये प्रामुख्याने प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासोबतच नियमीत लसीकरण आणि गर्भवतीसाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात ३७ नवे नागरी आरोग्य केंद्र
आपला दवाखाना साेबतच जिल्ह्यात ३७ नव्या नागरी आरोग्य केंद्रांनाही मंजुरी मिळाली आहे. यापैकी २२ नागरी आरोग्य केंद्र हे महापालिका क्षेत्रातील आहेत. पहिल्या टप्प्यात यातील आठ नागरी आरोग्य केंद्र सुरू होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय ग्रामीण भागात तालुकास्तरावर १५ नवे नागरी आरोग्य केंद्र राहणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
महापालिका क्षेत्रात एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तर २२ नागरी आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. १ मे रोजी शिवनी येथे आपला दवाखान्याचे उद्घाटन होणार आहे.
- डॉ. अनुप चौधरी, आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला
१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत नागरी आरोग्य केंद्र सुरू होत आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर एक असे सहा आपला दवाखाना सुरू होणार आहेत. याशिवाय १५ नागरी आरोग्य केंद्रांनाही मंजुरी मिळाली असून लवकरच रुग्णसेवेसाठी ते सुरू होणार आहेत.
- डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, अकोला