जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ५३५ ग्रामपंचायतींतील ८४४ गावांपैकी ७९३ गावे कोरोना विषाणूने बाधित होती, तर ५१ गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावच दिसून आला नाही.
कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून सद्य:स्थितीत ७४७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. या गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून सर्व रुग्ण बरे होऊन गाव कोरोनामुक्त झाले आहे. सद्य:स्थितीत ४६ गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून या गावांमध्ये ११२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १७८ उपप्राथमिक आरोग्य केंद्र, पाच ग्रामीण रुग्णालये व मूर्तिजापूर येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार केला जातो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.