मागील महिनाभरापासून जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारावर वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. प्रामुख्याने या शस्त्रक्रिया सायनस आणि दाताशी निगडित असून, विदर्भात अकोल्यासह अमरावती जिल्ह्यात या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तसेच किचकट शस्त्रक्रिया असल्यास रुग्णांना नागपूर येथे संदर्भित केले जात आहे. सद्य:स्थितीत अकोल्यात म्युकरमायकोसिसचे जिल्ह्याबाहेरील रुग्ण उपचारासाठी अकोल्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात ३५ पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया
मागील महिनाभरात जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ३५ पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश शस्त्रक्रिया गत आठवडाभरात झाल्या असून, बहुतांश रुग्ण शेजारील जिल्ह्यातील आहेत. तसेच १४ पेक्षा जास्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे.
विभागाची स्थिती
एकूण रुग्णसंख्या - २४०
बरे झालेले रुग्ण - ११५
उपचार सुरू असलेले रुग्ण - ११०
मृत्यू - १५
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून, शंभरपेक्षा जास्त रुग्ण यातून बरे झाले आहेत. काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहे. शस्त्रक्रियेचे काम पडू नये यासाठी रुग्णांनी आजाराचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारास सुरुवात करावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला