अकाेला: महानगर पालिकेची हद्दवाढ होऊन लगतची २४ गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर या गावांमधील १८ सरकारी स्वस्त धान्य दुकाने शहर पुरवठा विभागाशी संलग्न होणे अपेक्षित होते. तथापी, तहसिलदारांच्या पत्रानंतरही गत तीन वर्षांपासून १६ हजार लाभार्थिंना स्वस्त धान्य उपलब्ध करून देणारी १८ रेशन दुकाने शहरात असतानाही ग्रामीण पुरवठा विभागाला जोडलेली असून, त्याचा फटका रेशन कार्डधारकांना बसत आहे.
अकोला शहर व सात तालुक्यांमध्ये ३ लाख ४७ हजारापेक्षा अधिक रेशनकार्डधारक आहेत. यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, शेतकरी आदींंचा समावेश आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे शहरी व ग्रामीण अशा दोन विभाग आहेत. अकोला महानगर पालिकेचा विस्तार होऊन गुडधी, साेमठाणा, खरप बु., शिवर, शिवनी, शिलाेड़ा, पंचशील नगर, भाैरद मार्ग, हिंगणा म्हैसपुर, डाबकी, मलकापुर, शिवापुर, अकाेला बु., खड़की बु., अकाेली खुर्द, तपलाबाद, निजामपुर, सुकापुर, वाकापुर, शहनवाजपुर ही २४ गावे अकोला शहरात आली.
नियमानुसार शहरात समाविष्ट झाल्यानंतर या गावातील १८ रेशन दुकाने शहरातील अन्न पुरवठा विभागाला जोडणे गरजेचे होते. यासंदर्भात तत्कालीन तहसिलदार यांनी २९ डिसेंबर २०२९ रोजी अन्न पुरवठा अधिकारी यांना पत्र पाठवून या गावातील रेशन दुकाने व रेशन कार्डधारकांना शहरातील वितरण व्यवस्थेशी जोडण्याचे निर्देश दिले होते. या पत्राला आता दोन वर्षांपेक्षाही अधिक कालावधी उलटून गेला, परंतु १८ रेशन दुकाने व १६ हजार रेशन कार्डधारकांना अद्यापही शहर पुरवठा विभागाशी जोडण्यात आले नाही.
योग्य निर्णय घेऊ
रेशन कार्डद्वारे पात्र नागरिकांना रेशन उपलब्ध करण्याची सरकारी योजना महत्वपूर्ण आहे. तहसिलदार यांनी पत्र दिल्यानंतरही या गावातील रेशन दुकाने शहर वितरण व्यवस्थेशी का जोडण्यात आली नाही, याची चौकशी करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल.-अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला