- दीपक अग्रवाल
मूर्तिजापूर : येथून जवळच असलेल्या शेलू बोंडे या गावात मंदिराच्या लाउडस्पिकरवर शाळेबाहेरची शाळा भरते. प्रथम संस्थेतर्फे जिल्ह्यात हा उपक्रम राबिविल्या जात आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत; मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शेलू बोंडे येथील मंदिराच्या लाउडस्पिकरवर रेडिओ सुरू करून विद्यार्थ्यांना कार्यानुभव तसेच भाषा, गणित आदी विषयाचे धडे दिले जात आहे. या शाळेबाहेरच्या शाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, हे विशेष.नागपूर विभागात सध्या पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘शाळाबाहेरची शाळा’ राबविण्यात येतो आहे. त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू बोंडे येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आठवड्यामध्ये तीन दिवस घेतला जातो. मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी सकाळी १०.३५ वाजता लाउडस्पिकरद्वारे शिक्षणाचे धडे गिरवले जातात.तसेच विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅप व मोबाइल मॅसेजद्वारा गृहपाठ दिला जातो. यावर आधारित कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केला जातो. शेलू बोंडे येथे हा कार्यक्रम मंदिराच्या स्पिकरद्वारे स्वयंसेवकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऐकविला जातो. यासाठी गावचे सरपंच महादेवराव खांडेकर, उपसरपंच शोभा बोंडे, शाळा समिती अध्यक्ष अशोक बोंडे, संतोष बोंडे, शंकर वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. प्रथम संस्थेद्वारा तालुक्यातील सुमारे ३० गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.