अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शनिवार, ४ जुलै रोजी राज्यभरात शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात ३ हजार ६२३ अधिकारी-कर्मचार्यांची सर्वेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणात आढळणार्या शाळाबाह्य बालकाच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात येणार असून, त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणल्या जाणार आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षणाचा हक्क असून, त्याचे नाव शाळेच्या पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. या वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, या अनुषंगाने शनिवार, ४ जुलै रोजी राज्य स्तरावर शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम ह्यकुटुंब सर्वेक्षणाह्णच्या धर्तीवर राबविण्यात येत असून, या उपक्रमामध्ये महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक विभाग तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये सर्वेक्षण होणार असून, ग्रामीण भागासाठी ३ हजार १0४ अधिकार्यांची, तर शहरी भागासाठी ५१९ अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी, सीईओ करणार पडताळणी
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह हे अधिकारी शहरालगत असलेल्या शिवणी, शिवर आणि एमआयडीसी परिसरात शाळाबाह्य बालकांची पडताळणी करणार आहेत.
५0६ बालकांची संख्या वाढणार
मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५0६ शाळाबाह्य बालकांची नोंद करण्यात आली होती. यंदा ज्या बालकाचे नाव शाळेत दाखल आहे, परंतु पटावर उपस्थिती नाही, अशा बालकांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी शाळाबाह्य बालकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा समन्वयक जितेंद्र काठोळे यांनी वर्तविली. शाळाबाह्य बालकांना शिक्षक घेणार दत्तक सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक या बालकांना दत्तक घेणार आहेत. त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च संबंधीत शिक्षक उचलणार आहेत. बालकांच्या शाळा प्रवेशानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित बालकाचे आधारकार्ड काढण्यात येणार असून, गणवेश आणि पुस्तक वाटप करण्यात येणार आहे.