अकोला: तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात नियमबाह्य नियुक्त करण्यात आलेल्या अस्थायी नऊ कला शिक्षकांपैकी सात जणांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई बुधवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केली. आयुक्तांच्या कारवाईमुळे मनपाच्या शिक्षण विभागाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कला शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणाचा ह्यलोकमतह्णने सतत पाठपुरावा केला, हे येथे उल्लेखनीय. तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शिक्षण विभागाने तात्पुरत्या काळासाठी एकूण ३१ अस्थायी शिक्षकांची नियुक्ती केली होती. नियुक्त करण्यापूर्वी संबंधित शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी कोणताही हक्क किंवा दावा सांगता येणार नाही, अशी अट नमूद करण्यात आली होती. सुरुवातीला दर दोन महिन्यांनी अस्थायी शिक्षकांना नियुक्तीचे आदेश दिले जात होते. कालांतराने ३१ अस्थायी शिक्षकांना वेळोवेळी अदा होणारे भत्ते तसेच पाचवे व सहाव्या वेतन आयोगाचा नियमबाह्य लाभ मिळवून देण्यात आला. अस्थायी शिक्षकांना सेवेतून कमी करण्याचा मुद्दा प्रशासनाने लावून धरला असता, यामधील नऊ कला शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याप्रकरणी मनपाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर शिक्षण विभागामार्फत अहवाल मागविण्यात आला. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सात कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. विभुते आणि झाडे नामक कला शिक्षकांची सेवा यापूर्वीच समाप्त करण्यात आली होती.
महापालिकेचे सात अस्थायी कला शिक्षक सेवेतून बडतर्फ
By admin | Published: June 16, 2016 2:21 AM