अकोला: महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत असल्याचे आढळून येत आहे. अशास्थितीत साथीचे आजार बळावले असून साथ रोगांची लक्षणे व कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य असल्यामुळे भीतीपोटी कोरोना पाॅझिटीव्ह असलेल्या रुग्णांनी असुविधेची सबब पुढे करीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठ फिरविल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेचा वैद्यकीय आराेग्य विभाग निर्धास्त असल्याचे चित्र आहे.
शहरात एप्रिल ते जून या कालावधीत कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला होता. शहराच्या प्रत्येक भागात कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असल्याने त्यावेळी मनपा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र होते. रूग्णांची संख्या वाढत चालल्याचे पाहून तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी नागरिकांच्या ‘थ्रोट स्वॅब’चाचणीसाठी झोन निहाय शिबीराचे आयोजन केले होते. या कालावधीत रूग्णांच्या संख्येत चढऊतार हाेत असल्याचे चित्र समाेर आले. दिवाळी संपल्यानंतर काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत गेल्याचे दिसून आले. यासंदर्भात मनपा प्रशासनाने जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असताना मनपाची वैद्यकीय आराेग्य यंत्रणा कमालीची बेफिकर असल्याचे समाेर आले.
अकोलेकर गाफील;प्रशासनाचा कानाडोळा
शहरात काेराेना रूग्णांची संख्या वाढत असताना अकोलेकर कमालीचे गाफील असल्याचे पहावयास मिळत आहे. दुसरीकडे मनपा प्रशासनाकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. तोंडाला रूमाल किंवा मास्क न लावता नागरिक घराबाहेर निघतात. अशावेळी मनपाने कारवाइचा दंडूका उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.
वैद्यकीय विभाग दिशाभूल करण्यात पटाईत
टाळेबंदीच्या कालावधीत शहरात काेराेना रूग्णांची संख्या वाढत चालली असताना मनपाच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेकडे रुग्णांची माहिती उपलब्ध नसल्याचे अनेकदा तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्यासमाेर उघडकीस आले हाेते. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनी काेराेनाचा आढावा घेतला असता त्या बैठकीतही वैद्यकीय विभाग प्रमुखांनी मनपा उपायुक्तांना दिशाभूल करणारी माहिती सादर करीत उपायुक्तांना ताेंडघशी पाडले हाेते. या विभागातील कामचूकार अधिकारी,कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचे आयुक्त निमा अराेरा यांच्यासमाेर आव्हान आहे.