-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची झळ संपत नाही तोच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे असल्याने शेकडो हेक्टर वरील सोयाबीनच्या परीपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे. २३-२४ जुलै व ६-७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली आली होती. २३ - २४ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी काठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्षांक होता जवळपास हा लक्षांक पुर्ण झाला असून ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमीनत पुराचे पाणी शिरले होते त्यात शेती खरडून गेल्याने अंतिम अहवालात नुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ६-७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात ४४३ हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता त्या पेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती यावर्षी ती ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तुर ११ हजार १५६ पेरणी झाली आहे. परंतू सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तुर, कपाशी या मुख्य पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही तोच भरीस भर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमन केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परीपक्व अवस्थेत असताना सुकल्या आहेत यामुळे पुन्हा शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असून शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेतला आहे. यात हजारो हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याने सदर पिकाचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 6:39 PM