संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाच सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, शेकडो हेक्टरवरील सोयाबीनच्या परिपक्व शेंगा जाळल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवले आहे.
जुलै महिन्यात २३ ते २४ जुलै व सप्टेंबर महिन्यात ६ ते ७ सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात खरीप पिके पाण्याखाली गेली होती. अतिवृष्टीमुळे
काही भागात नदीकाठावरील गावातील शेतीत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात ७२ हजार ६९८ पेरणी लक्ष्यांक होता, जवळपास हा लक्ष्यांक पूर्ण झाला असून, ७ हजार ५२६ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली. यातील २३ - २४ जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी काठावर असलेल्या शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले होते. त्यात शेती खरडून गेल्याने अंतिम अहवालानुसार ७० गावातील ६३१.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात १ हजार ७०४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ४४३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त हेक्टरवरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.
-----------------
कपाशीचा पेरा निम्म्याने घटला!
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पेरा ११ हजार ६३५ हेक्टर होता, त्यापेक्षा यावर्षी कपाशी पेऱ्यात निम्म्याने घट झाल्याने तो केवळ ६ हजार ८७२ हेक्टरवर आला आहे. सोयाबीनची गतवर्षी ४३ हजार ८४० हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी ४७ हजार १७७ हेक्टर झाली. तूर ११ हजार १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु, सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कपाशी या मुख्य पिकांचे नुकसान झाले आहे.
--------------------------
हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती
अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी जात नाही, तोच तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. सोयाबीनला आलेल्या शेंगा त्या परिपक्व अवस्थेत असताना सुकत असल्याचे चित्र आहे. अज्ञात रोगामुळे शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास तोही या अज्ञात रोगाने हिसकावून घेण्याची भीती आहे. सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
------------------
असा होता पीक पेरा
तूर ११ हजर १५६ हेक्टर, उडीद १ हजार २४१ हेक्टर, मूग ३ हजार ७२० हेक्टर, ऊस ११.४ हेक्टर, तीळ १३ हेक्टर, सोयाबीन ४७ हजार १७७ हेक्टर, कापूस ६ हजार ८७२ हेक्टर.
---------------------------
माझ्याकडे एकूण आठ एकर शेती आहे. मी यावर्षी सोयाबीन व तूर या पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन पीक ऐन परिपक्व अवस्थेत येत असतानाच अचानक शेतातील झाडाच्या शेंगा वाळल्या आहेत. यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले.
-दिलीप दुर्गे, शेतकरी, धामोरी.