दहीहंडा : अकोला तालुक्यातील दहीहंडा परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरली असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये जवळपास ८० ते ९० रुग्णांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ लहान-मोठी गावे येतात. काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे परिसरात ताप, सर्दी, आदी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रोजची ओपीडी वाढली आहे. परिसरातील गावांचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारांसाठी येतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी जवळपास ९०च्या घरात गेली आहे. तसेच खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी वाढली आहे.
------
उमरा येथे डेंग्यूसदृश आजाराचे १० रुग्ण आढळले!
उमरा : गावात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत डेंग्यूसदृश आजाराचे तब्बल दहा रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात व्हायरल फिव्हरची साथ पसरली आहे. ताप, डोके दुखणे, हातपाय दुखणे, सर्दी, आदी आजारांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गावात धूळ यंत्र खरेदी केली होती; मात्र अद्यापही धूळ फवारणी झाली नाही. त्यामुळे डासांचा उद्रेक वाढला आहे. नालेसफाई, जंतुनाशक औषधांची फवारणी, पाणी तपासणी सांडपाण्याची विल्हेवाट करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.