अकोला: गत दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेला तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या पानांच्या कडा पिवळसर होऊन ते लालसर पडत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर तुडतुड्यांसह फुलकिड्यांचादेखील प्रादुर्भाव वाढत आहे. फुलकिड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या शिरेजवळ राहून पानातील रस शोषून घेत आहेत. फुलकिड्यांनी रखडलेल्या भागावर पांढुरके चट्टे दिसून येत आहेत. प्रादुर्भावग्रस्त भागातील कपाशीच्या पानांच्या पेशी शुष्क होत असून, जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या भागात कपाशीच्या पानांचा रंग लाल होत आहे. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना व्यवस्थापनासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.असे करावे व्यवस्थापन
- नत्र खताचा वापर शिफारशीनुसारच करावा. अवास्तव वापर टाळावा.
- पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडीराक्टीन १५०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडीराक्टीन ३००० पीपीएम ४० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आठवड्यातून किमान एक वेळा पिकाचे सर्वेक्षण करावे.
- किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यासच (२ तुडतुडे प्रती पान, १० फुलकिडे प्रती पान) रासायनिक व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
त्याकरिता प्राफेनोफॉस ५० इसी मिली (एकरी ४०० मिली) किंवा बुप्रोफेझीन २५ एस सी २० मिली (एकरी ४०० मिली) किंवा प्लोनिकअमीड ५० डब्ल्यू डी जी ४ ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर तुडतुड्यांसह फुलअडीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकºयांनी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे.- डॉ. चारुदत्त ठिपसे, कृषी विज्ञान केंद्र,अकोला.