कोरोनाकाळातील वीज बिल माफ करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. शिवाय कोरोनाकाळात महावितरण कंपनीच्या खासगी कंत्राटदाराने ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंगसुद्धा नेले नव्हते. कोरोनाकाळातील वीज बिल माफ करण्याची सर्वच स्तरांवरून मागणी होत असतानाच दुसरीकडे महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांकडून सक्तीने वीज बिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने सर्वसामान्य वीज ग्राहक व शेतकऱ्यांमध्येसुद्धा रोष व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावण्यात आला होता. असे संपूर्ण १० महिने कोरोनामुळे सर्वच प्रकारचे उद्योग तथा व्यवसाय बंद होते. कोरोनाकाळात रोजगार हिरावल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याने दहा महिन्यांच्या कालावधीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता महावितरणच्या वतीने ग्राहकांना व शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याकरिता तगादा लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळातील वीज बिल जादा दर लावून पाठविण्यात आले आहे.
कोरोनाकाळातील वीज बिल हे व्याजदर लावून आले व बऱ्याच वेळा वीज वितरण कंपनीचे रीडिंग वेळवर येत नसल्याने नाहक आम्हाला जास्त दर लावून वीज बिल मिळत आहे.
- शैलेश निमकर्डे, नागरिक