पातूर : जिल्ह्यासह पातूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, नांदखेड गावाने कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले आहे. आजपर्यंत गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमामुळे मोठी मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकीच्या जोरावर व जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले.
तालुक्यातील नांदखेड हे डोंगरदऱ्यात वसलेले गाव. गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गंत ग्रामपंचायतीने गावात सर्वेक्षण, नागरिकांची कोरोना चाचणी, दुकानदार आदींवर भर दिला. ग्रामस्थांची एकता ही मोठी ताकद ठरली असून, त्याचा फायदा कोरोनाच्या संकटकाळात झाला आहे. कोरोनादूत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत होते. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास, अशा प्रकारचा त्रास होत आहे काय, याची त्वरित दखल घेतल्या जात होती. नागरिकांना कोरोनाविषयी माहिती देण्यात येत होती. नागरिकांच्या एकीने व कोरोनाविषयक घेतलेल्या काळजीने नांदखेडवासीयांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.
गावाची लोकसंख्या ७१९
कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच विजय इंगळे, ग्रा.पं. सचिव शरद उंडाळ, पोलीस पाटील वनिता बोचरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे, शिर्ला उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विलास इंगोले, आरोग्यसेवक प्रदीप विजय मोहोकार, आरोग्यसेविका पौर्णिमा कडू, रेखा सपकाळ, आशा स्वयंसेविका सुकेशिनी वानखेडे, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. संकट काळात एकमेकांची साथ असल्याने कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही.
फोटा: मेल फोटो
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात फवारणी करण्यावर भर दिला. ग्रामस्थांना सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली.
ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. त्यामुळेच कोरोनावर मात करता आली.
-शरद उंडाळ, ग्रामसेवक, नांदखेड
कोसगावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. याचे श्रेय ग्रामस्थांना आहे. आदिवासीबहुल असलेल्या गावात एकमेकांची साथ मिळाल्यानेच कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यात यशस्वी झाले.
-विजय इंगळे, सरपंच, नांदखेड